Description
Popular Prakashan The Extras by Kiran Nagarkar
जुन्या मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कादंबरी किरण नगरकरांच्या चित्रदर्शी आणि मिस्कील शैलीमुळे वाचनीय झाली आहे. रावण आणि एडी या दोन नायकांची ओळख यापूर्वी स्वत नगरकरांनी लिहिलेल्या 'रावण आणि एडी" या कादंबरीतून वाचकांना झालीच आहे. 'रावण आणि एडी'मध्ये त्या दोघांची बालपण आणि पौगंडावस्थेतील कथा आली आहे तर 'द एक्सट्राज'मध्ये त्यांच्या तारुण्यातल्या -- सर्वसामान्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असलेल्या नोकरी, करियर, प्रेम, लग्न अशा -- अनेक समस्यांवर नगरकर मिस्कील शैलीत भाष्य करतात. याशिवाय कादंबरीत अनेक उपकथानकं आहेत. नगरकरांच्या शैलीतील अतिशयोक्ती क्वचित अवास्तव वाटली तरी मराठीत असं लेखन दुर्लभ असल्यामुळे ती वाचताना आनंद देते. रावण आणि एडी हे दोघंही आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रपट क्षेत्रात आपलं नशीब आजमावतात. परंतु अखेरीस मुख्य पात्राच्या मागे असणाऱ्या 'एक्सट्रा' कलावंतांमध्येच ते गर्दीतले कलाकार उरतात. चित्रपट क्षेत्र हे या कादंबरीचा मुख्य भाग म्हणून येत नसले तरी चित्रपट उद्योग आणि त्याच्या कामकाजातल्या बारीकसारीक तपशिलांचा नगरकरांनी बारकाईने अभ्यास केल्याचे कादंबरी वाचताना लक्षात येतं.